वाहनचालकांनो, विश्रांती तर हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:26 AM2020-02-21T02:26:07+5:302020-02-21T02:26:33+5:30

तर याबाबत जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, खालापूर येथे

Drivers must rest! on road, traffic jam mumbai | वाहनचालकांनो, विश्रांती तर हवीच!

वाहनचालकांनो, विश्रांती तर हवीच!

Next

नितीन जगताप 

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २०१९ मध्ये जीवघेण्या दुर्घटनांपैकी ५० टक्के दुर्घटना अवजड वाहनांना पाठीमागून धडक होऊन झाल्या आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी विश्रांती न घेणे आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अपघात टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यायलाच हवी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक जास्त आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. त्यामुळे चालक रस्ता सोडून पांढऱ्या पट्टीवर गेल्याने अपघात होतात. पण हे रोखण्यासाठी थकवा आला असेल तर विश्रांती करणे गरजेचे आहे. अवजड वाहनांसाठी खालापूर येथे विश्रांतीगृह आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर लहान वाहनांना रस्त्यात हॉटेल आणि मॉल आहेत तेथे विश्रांती करता येईल, असेही ते म्हणाले.

तर याबाबत जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, खालापूर येथे वाहनचालकांच्या विश्रांतीची व्यवस्था आहे, पण ती पुरेशी नाही. तसेच अनेक वेळा तिथे चोरीचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे वाहनचालक तिथे विश्रांती करण्याचे टाळतात.
सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी म्हणाले की, अवजड वाहन अपघातामध्ये थकवा हे प्रमुख कारण आहे. अवजड वाहनांमध्ये चालकांच्या कमतरतेमुळे चालक जास्त वेळ गाडी चालवतात.
सेव्ह लाइफ फाउंडेशनने गेल्या तीन वर्षात केलेल्या अभ्यासात अपघाताचे प्रमुख कारण झोप न घेणे हे आहे. त्यावर उपाय म्हणजे चालकांनी पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. तसेच अवजड वाहने आणि प्रवासी वाहनांमध्ये फटीग डिटेक्टशन डिव्हाइस लावायला हवे. त्यामुळे चालक झोपत असेल तर अलार्म वाजेल.

तळेगाव ते वडगाव नो एंट्रीमुळे अपघात
तळेगाव ते वडगाव फाटा येथे सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत नो एन्ट्री लागू आहे. त्यामुळे जालना, औरंगाबाद, नगर येथून निघालेल्या वाहनचालकांना तळेगाव ते वडगाव हे अंतर पार करावे लागते. नो एंट्रीमुळे वाहनचालक कोठेही न थांबता किंवा विश्रांती न घेता वाहन चालवतात. त्यामुळे कामशेत, लोणावळा व खंडाळा भागात जास्त अपघात होतात. जर तळेगाव ते वडगाव फाटा येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत नो एंट्री शिथिल केली तर अपघातांचे प्रमाण कमी होईल, तसेच मुंबई, वाशी, पनवेल, उरण या ठिकाणी वाहनचालकांना वेळेत पोहोचता येईल.
- राजेंद्र वनवे, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशन

वाहनचालक थकलेले असतील तर त्यांच्यासाठी विश्रांतीची व्यवस्था आहे. तिथे विश्रांती करावी. तसेच रोड शोल्डरचा लेन म्हणून वापर करावा. विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करू नये.
- विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय)

Web Title: Drivers must rest! on road, traffic jam mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.