लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रिक्षाचालक ‘यू टर्न’ घेत असताना त्याचा तोल गेल्यामुळे रिक्षाची धडक १७ वर्षांच्या युवकाला बसली व तो जवळच्या खड्ड्यात पडला. त्याच्या मागोमाग रिक्षाही खड्ड्यात कोसळली आणि खड्ड्याजवळील बॅरिकेट्सचा रॉड काळ बनून मुलाच्या डोक्यात शिरला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणीत मंगळवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलीस या प्रकरणी रिक्षाचालकाची चौकशी करीत आहेत.
मालवणीच्या अंबोजवाडीमध्ये पालिकेच्या मैलापाणी वाहिन्यांचे काम सुरू आहे. त्याच कामासाठी त्या ठिकाणी खड्डा खणण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खड्डा जवळपास पाच ते सहा फूट खोल असून, त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्याच रस्त्यावरून दीपक कुमार यादव (२६) हा रिक्षाचालक यू टर्न घेण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, या प्रयत्नात त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरून चालत असलेल्या वासिम अन्सारी (१७) याला रिक्षाची धडक बसली. त्यामुळे तोल जाऊन ताे खड्ड्यात पडला. मागोमाग रिक्षाही कोसळली. बॅरिकेट्सचा लोखंडी रॉड मुलाच्या डोक्यात घुसल्याने ताे गंभीर जखमी झाला. याबाबत स्थानिकांनी मालवणी पोलिसांना कळविले आणि त्याला तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर रिक्षाचालक यादव थाेडक्यात वाचला. यादवलाही किरकोळ जखमा झाल्या असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.