Join us

२५ वर्षे विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांना मिळणार २५ हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या चालकांची २५ वर्षे विनाअपघात सेवा झाली आहे, अशा चालकांचा यापुढे राज्यस्तरावर सत्कार करून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्या चालकांची २५ वर्षे विनाअपघात सेवा झाली आहे, अशा चालकांचा यापुढे राज्यस्तरावर सत्कार करून, २५ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली.

सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाकडून १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन सोमवारी परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे झाले, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी एसटी महामंडळात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील ५ चालकांचा परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

तर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, केवळ एसटीच्या प्रवाशांचेच नव्हे तर रस्त्यावरील चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संस्कार एसटीच्या चालकांत रुजविणे हा रस्ते सुरक्षितता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.