महाविद्यालयातून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चे वाटप रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:56 AM2018-08-25T05:56:25+5:302018-08-25T05:56:57+5:30
शिकाऊ परवान्याची घोषणा हवेतच; २० महिने उलटूनही अंमलबजावणी नाही
- महेश चेमटे
मुंबई : महाविद्यालयीन वयात रस्तासुरक्षेची माहिती तरुणांना व्हावी, यासाठी महाविद्यालयातून शिकाऊ परवाना देण्याची घोषणा करण्यात आली होती. तब्बल २० महिने उलटूनही तिच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळत नसल्याचे समोर आले आहे.
राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक व इतर परिवहन विभागाच्या कार्यालयात वाहन चालविण्याचा शिकाऊ आणि कायमस्वरूपी परवाना मिळविण्यासाठी वाहनचालकांची रोज गर्दी होते. यातच आरटीओतील दलाल परवाना काढून देण्याच्या नावाखाली हजारो रुपये उकळतात. दलालांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना कमी त्रासात परवाना मिळण्यासाठी जानेवारी २०१७ मध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र, २० महिने उलटूनही या घोषणेच्या अंमलबजावणीस मुहूर्त मिळालेला नाही.
मुंबई, नाशिकमध्ये महाविद्यालयातून परवाना वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. तेथे तो यशस्वी झाल्यानंतर, संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे तत्कालीन परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले होते. मात्र, अद्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
दिल्लीने करून दाखविले, मुंबईत प्रतीक्षा
दिल्ली परिवहन विभागानेही महाविद्यालयातून परवाना वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. सद्यस्थितीत दिल्लीतील ४ महाविद्यालयांतून परवाना वाटप करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आणखी १० महाविद्यालयांमध्ये परवाना वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
महिनाभरात सुविधा उपलब्ध होईल
महाविद्यालयाच्या माध्यमातून परवाना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानुसार, सर्व विद्यापीठातील कुलगुरूंना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नागपूरमधील काही महाविद्यालयांमध्ये स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून परवाना देण्यात येत आहे. महिनाभरात मुंबईसह राज्यातील सर्व महाविद्यालयातून वाहन परवाना उपलब्ध होईल. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र
महिलांत वाहनांची क्रेझ अधिक
राज्यात १ जानेवारी, २०१८ रोजी राज्यात एकूण ३.१४ कोटी मोटार वाहने वापरात होती. यापैकी ३१.७९ लाख वाहने केवळ मुंबईत आहेत. मुंबईतील चार आरटीओंच्या माध्यमाने
२०१७-१८ मध्ये १.६ लाख नागरिकांना परवाना देण्यात आला. यात ५५ हजारांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.
माहिती देणे गरजेचे
महाविद्यालयातून वाहन परवाना मिळणार, असे गेल्या वर्षी ऐकायला मिळाले होते. त्यानंतर, याची कोणतीही माहिती मिळाली नाही. वाहन परवान्यासाठी अजूनही आरटीओमध्ये खेटे घालावे लागतात. महाविद्यालयीन प्रशासनाने याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्याची व प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज आहे.
-निधी पेडणेकर, विद्यार्थी, रुईया महाविद्यालय.