वाहनचालक झाले शिस्तबद्ध
By admin | Published: November 6, 2014 01:47 AM2014-11-06T01:47:19+5:302014-11-06T01:47:19+5:30
बेदरकारपणे वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, नो पार्किंग इत्यादी वाहतुकीचे नियम मोडण्यात पुढे असणाऱ्या मुंबईकरांनी तीन महिन्यांत वाहतूक नियम चांगल्यारीतीने पाळले आहेत.
मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, नो पार्किंग इत्यादी वाहतुकीचे नियम मोडण्यात पुढे असणाऱ्या मुंबईकरांनी तीन महिन्यांत वाहतूक नियम चांगल्यारीतीने पाळले आहेत. आॅगस्ट महिन्यात १ लाख ७४ हजार २३७ विविध केसेस झालेल्या असतानाच आॅक्टोबर महिन्यात तब्बल २९ हजार ६८८ केसेस कमी झाल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई हाती घेतल्यानेच वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी झाल्याचे सांगण्यात येते.
मुंबई शहर आणि उपनगरांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दिवसाला ३00 ते ४00 नवीन वाहनांची नोंद होत आहे. हे पाहता वाहनांची संख्या वाढतानाच तेवढ्याच प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनास वाहतूक पोलिसांकडून विशेष कारवाईदेखील करून रोखण्यात येते. तरीही पुन्हा जैसे थे परिस्थिती दिसते. मात्र गेल्या तीन महिन्यांत मुंबईकरांनी वाहतूक नियम चांगल्यारीतीने पाळल्याचे समोर आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मार्गिका तोडणे, नो पार्किंग, कर्णकर्कश हॉर्न, काळ्या काचा, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे इत्यादी वाहतुकीचे नियम मुंबईकरांनी पाळले असून, त्यामुळे गुन्हे कमी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत वाहतुकीचे विविध नियम मोडल्याच्या ४ लाख ८0 हजार ६0३ केसेस दाखल झाल्या असून, एकूण ५ कोटी २२ लाख ४५ हजार १५0 दंड वसूल करण्यात आला आहे. यात २0१४ च्या आॅगस्ट महिन्यात १ लाख ७४ हजार २३७ केसेस, सप्टेंबर महिन्यात १ लाख ६१ हजार ८१७ केसेस आणि आॅक्टोबर महिन्यात १ लाख ४४ हजार ५४९ केसेस दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)