मुंबई : मुंबईकरांचा गुरुवार रिमझिम पावसाचा ठरला. कुलाबा येथे सकाळी ८.३० वाजता ५ तर सांताक्रूझ येथे २२.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळनंतर लागून राहिलेला रिमझिम पाऊस रात्री ऊशिरापर्यंत लागून होता. या काळात मुंबईत एक ठिकाणी भिंतीचा काही भाग पडला. १० ठिकाणी झाडे पडली. १ ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली.
सकाळी रिमझिम सुरु असलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र दुपारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी काही काळ पुन्हा पावसाने उघडीप घेतली होती. राज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २१ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी जोरदार आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनारी वेगाने वारे वाहतील. तर मुंबईत शुक्रवारसह शनिवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.