मुंबई : मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि युवा खेळाडूंची गुणवत्ता अचूक हेरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देणारे वासू परांजपे यांचे सोमवारी मुंबईत वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. १९५६ ते १९७० दरम्यान त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळताना मुंबईसह बडोदा संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. लिटल मास्टर सुनील गावसकर यांना ‘सनी’ हे टोपणनाव परांजपे यांनीच दिले होते.
परांजपे यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि भारताचे माजी क्रिकेटपटू व राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य जतिन असा परिवार आहे. मुंबईच्या १२ रणजी विजेतेपदांमध्ये सहभाग असलेल्या परांजपे यांनी कारकिर्दीत ७८५ धावांसह नऊ बळीही घेतले. १९६४-६५च्या रणजी मोसमात बडोदाविरुद्ध केलेली १२७ धावांची खेळी त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली. केवळ गावसकरच नाही तर दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व रोहित शर्मा अशा दिग्गजांच्या कारकिर्दीमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणून परांजपे यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनीच मुश्ताक अली यांना १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची ओळख करून देत म्हणाले होते की, ‘हा सुनील गावसकरनंतरचा देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.’ भारतीयच नव्हे तर सनथ जयसूर्या, रोशन महानामा या श्रीलंकन खेळाडूंनाही परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले. राहुल द्रविड सुरुवातीला यष्टिरक्षक म्हणून खेळत असे. तो १४ वर्षांचा असताना परांजपे यांनी त्याला तू भारताकडून नक्की खेळशील, असा विश्वास दिला. तसेच यष्टिरक्षणापेक्षा फलंदाजीकडे अधिक लक्ष दे असा सल्लाही दिला. द्रविडने हा सल्ला गंभीरतेने घेतला.
..असा झालेला रोहितचा प्रवेश
वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील खेळाडूंच्या शिबिरातून ३० पैकी १५ खेळाडूंची निवड होणार होती. तेव्हा रोहित शर्मा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता आणि परांजपे त्याच्या सरावाकडे बारीक लक्ष देत होते. तत्कालीन मुंबईचा कर्णधार प्रशांत नाईक याला परांजपे यांनी रोहित संघात असायला हवा असे सांगितले. विशेष म्हणजे तेव्हा प्रशांत हा रोहितला ओळखतही नव्हता. मात्र परांजपे सरांच्या सांगण्यावरून रोहितला संधी मिळाली आणि भारतीय क्रिकेटला हिटमॅन लाभला.