मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. विमानतळ परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक (सीएसएमटी), कुलाबा आणि अंधेरी परिसरात ड्रोन उडविण्यासह पॅरा ग्लायडिंग, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, सर्व प्रकारचे फुगे, पतंग, आदींच्या उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अंतर्गत याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंतप्रधानांच्या दाैऱ्यावेळी होणाऱ्या गर्दीला टार्गेट करून कोणतीही अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
सोबतच शहराच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहने, व्यक्ती आणि सामानांची श्वानपथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथक, मेटल डिटेक्टर आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी करण्यातयेत आहे.
यंत्रणांचा समन्वय -नरेंद्र मोदी कुलाबा येथे आयएनएस शिक्रा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनन्स, तसेच मरोळ, अंधेरी परिसरात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहू नयेत यासाठी मुंबई पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वय साधून बंदोबस्ताची आखणी करत आहेत. विमानतळ पोलिस ठाणे, सहार पोलिस ठाणे, कुलाबा पोलिस ठाणे, माता रमाबाई मार्ग पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे आणि अंधेरी पोलिस ठाणे यांच्या हद्दीत फुगे व पतंग उडविण्यावर ९ च्या मध्यरात्रीपासून १० तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घातली आहे.