मुंबई : महापारेषणच्या नवीन प्रकल्पात सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग केला जाणार आहे. हे डायग्नोस्टिक टूल ठरल्याचा दावादेखील महापारेषणने केला आहे. शिवाय कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाल्याचे महापारेषणने म्हटले आहे.
महापारेषणच्या अतिउच्चदाब विद्युत वाहिन्यांची निगा राखण्याचे काम म्हणजे ग्राउंड पेट्रोलिंग, मंकी पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे ड्रोनद्वारे केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागामार्फत परवानगी घेऊन करण्याचा उपक्रम महापारेषणने २०१९ मध्ये घेतला होता. ड्रोनद्वारे यापूर्वी सर्वेक्षण झाले असून, यात मुख्यत्वे गहाळ झालेले नटबोल्टस्, कॉटर पीन्स, कंडक्टवरील हार्डवेअर्स, फुटलेले इन्सुलेटर्स आदी बिघाड निदर्शनास आले आहेत. यामुळे दुरुस्ती करण्यास वाव मिळाला आहे.
विशेषत: दुर्गम नदी, डोंगर, जंगल या भागांतून जाणाऱ्या पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रीतीने होतो. ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा आणि थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्याने पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे दोष त्वरित निदर्शनास आणून त्याची दुरुस्ती करणे शक्य होत आहे. आतापर्यंत ४०० केव्ही लाइन्सवरील ३५४ ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. यात १४० बिघाड निदर्शनास आले. यापैकी १४० बिघाड दुरुस्त करण्यात आले. २२० केव्ही लाइन्सवरील ५२८ ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. ४२ बिघाड निदर्शनास आले. २२ बिघाड दुरुस्त करण्यात आले.