Join us

धोबीघाट परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी; मुंबई महापालिकेचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 6:32 PM

जी दक्षिण विभागामध्ये सीएसआरमधून ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपयापर्यंत आहे.

मुंबई - परळ येथील गिरण परिसरातील डासांची उत्पत्ती स्थाने ड्रोनद्वारे नष्ट करण्यात आली. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर आता महालक्ष्मी धोबीघाट येथील मलेरिया व डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी करण्यात आली. 

जुन्या व धोकादायक ठरलेल्या गिरण्यांवर चढून कीटकनाशक फवारणी करणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा प्रयोग यंदा करण्यात आला. त्यानंतर सोमवारी महालक्ष्मी धोबीघाट येथील नागरिकांच्या घराच्या छतांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागांमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. 

अशी घ्या काळजी

घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणले.

येथे तयार होतात डासांचे अड्डे

जी दक्षिण विभागामध्ये सीएसआरमधून ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपयापर्यंत आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या गिरण्या, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री आहेत. अशा ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डांसाची उत्पत्ती होत असते. 

यासाठी ड्रोनचा वापरअशा ठिकाणी पाहणी करून अळीनाशक फवारणी करण्याकरीता किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. परिणामी, अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे ड्रोनच्या सह्याने जून-२०२१ पासून या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा  ड्रोन  उडविण्यासाठी थींक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे. 

रुग्ण संख्येत घटया विभागात ६८९ एवढे मलेरियावाहक डांस उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात आली. परिणामी, गेल्यावर्षी जून ते ऑगस्ट २०२० मध्ये  ९०० मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी जून ते ऑगस्ट काळात ४७४ मलेरिया रुग्ण सापडले आहेत.  

ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीतून कमी पैशात जास्त परिणामकारकता साध्य होते. त्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास हातभार लागेल. - किशोरी पेडणेकर (महापौर, मुंबई)

टॅग्स :मुंबई महानगरपालिका