मुंबई : बंद गिरण्यांचा परिसर मलेरिया व डेंग्यूच्या डासांचे अड्डे बनले आहेत. डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास पालिकेच्या जी दक्षिण विभागाने सुरुवात केली आहे. यामुळे या विभागातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत ५४ टक्के घट झाली आहे.
लोअर परळ, प्रभादेवी, वरळी आणि महालक्ष्मी या भागांमध्ये असलेल्या बंद गिरण परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. त्यामुळे हा विभाग मलेरियाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र या गिरण्यांची उंची अधिक असून त्या धोकादायक स्थितीत असल्याने कीटकनाशक फवारणी करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे गेल्या वर्षीपासून पालिकेने गिरण परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे.
यासाठी सीएसआर फंडातून सात लाख किमतीचे ड्रोन घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी कोविडकाळात याचा पुरेसा वापर करता आला नाही. मात्र जानेवारी २०२१ पासून ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी सुरू आहे. दहा लीटरची टाकी असलेल्या या ड्रोनमुळे १५ मिनिटात संपूर्ण गिरण परिसरात कीटकनाशक फवारणी करून पूर्ण होते. यामुळे वेळेची बचत होत आहे. या ड्रोनला कॅमेरा असल्यामुळे भविष्यात आपत्कालीन विभागासाठीही त्याचा उपयोग केला जाणार आहे.