माहिम कॉझव्हे परिसरात ड्रोनने व्हिडिओ शूटिंग, कंपनीसह ५ जणांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
By गौरी टेंबकर | Published: September 10, 2024 09:51 AM2024-09-10T09:51:57+5:302024-09-10T09:52:16+5:30
Mumbai Crime News: वांद्रे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने माहीम कॉझव्हे या ठिकाणी ड्रोन ने व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याना रंगेहाथ पकडले. त्यानुसार संबंधित कंपनीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - वांद्रे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने माहीम कॉझव्हे या ठिकाणी ड्रोन ने व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याना रंगेहाथ पकडले. त्यानुसार संबंधित कंपनीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरात ३० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर पर्यंतच्या रात्री पर्यंत बेकायदेशीररित्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. वांद्रे पश्चिमच्या माहीम कॉझव्हे परिसरात दोन जण ड्रोनने व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे वांद्रे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमोडे यांनी गस्तीदरम्यान पाहिले. त्यानुसार पथकाने त्यांच्याकडे जाऊन चौकशी केल्यावर
फ्रीलान्सर म्हणून काम करणारे ड्रोन ऑपरेटर सुयश गोलतकर (२४), फोटोग्राफर हीतक ठक्कर (३०) यांच्याकडे ड्रोन उडवण्याची परवानगी नसूनही ते व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे उघड झाले. त्यांनी ट्राईब्स या कंपनीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडून असलेल्या होर्डिंगची जाहिरात करण्यासाठी व्हिडिओग्राफी केली असेही चौकशी दरम्यान कबूल केले. हा ड्रोन मेहुल बाऊआ याच्या मालकीचा असून त्याची किंमत तब्बल एक लाख रुपये आहे. तसेच शूटिंगचे कंत्राट अमित कोरे याने दिल्याचेही दोघांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ट्राईब्स कंपनीसह पाच जणांवर बीएनएस कायद्याचे कलम २२३,३(५) अंतर्गत सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला.