लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता विनापरवाना उडणारे ड्रोन निकामी करणार असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. नौदलाच्या मुंबईतील आस्थापनापासून तीन किलोमीटरचा परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव कोणतेही ड्रोन उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ड्रोनच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ड्रोनच्या उड्डाणापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष ड्रोनचा वापर करण्याच्या किमान आठ दिवसापूर्वी www.dgca.nic.in संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरी उड्डाण महासंचालकांची (डीजीसीए) परवानगी घेणे आवश्यक आहे. डीजीसीएची मान्यता मिळाल्याची प्रत नौदलाच्या पश्चिम कमांडच्या मुख्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. नौदल परिसरात पूर्वपरवानगीशिवाय उडणारे कोणतेही हवाई ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) आढळल्यास ते जप्त किंवा नष्ट केले जातील. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराही नौदलाने दिला आहे.