आगीवरील नियंत्रणासाठी ड्रोन गरजेचे; तज्ज्ञांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:51 AM2019-07-23T04:51:28+5:302019-07-23T06:31:25+5:30

अग्निसुरक्षेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे पालिकेकडून आवाहन

Drones needed for fire control; | आगीवरील नियंत्रणासाठी ड्रोन गरजेचे; तज्ज्ञांची मागणी

आगीवरील नियंत्रणासाठी ड्रोन गरजेचे; तज्ज्ञांची मागणी

Next

मुंबई : अग्निशमन दलाकडून वारंवार सूचना करूनही उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे दिसून येते. अग्निशमन दलाच्या शिड्या केवळ ३०व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यावरील मजल्यांवर मदतकार्यासाठी आगीचा अंदाज, घटनेची तीव्रता व स्वरूप कळणे आवश्यक आहे. अशा वेळी स्थितीचा आढावा घेत, कमी वेळेत उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेरा बसविण्याची मागणी तज्ज्ञांकडून जोर धरत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महापालिकेने विद्युत जोडणी, विद्युत उपकरणे, वायरिंग आदींबाबत अत्यंत सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगत, अग्निसुरक्षेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहन महापालिकेसह अग्निशमन क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुंबईकरांना वारंवार केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे, अयोग्य विद्युत जोडणीमुळे आग लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग याबाबत अत्यंत सजग असणे गरजेचे आहे. परिणामी, विद्युत उपकरणांनुसार किती क्षमतेचा विद्युत प्रवाह (वीजदाब) लागणार आहे? याची तपासणी करून त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे हे वीज दाब क्षमतेला अनुरूप, तसेच आयएसआय प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करून घ्यावी. मीटर केबिनसह, ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, तेथे मेन स्विच तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत. अन्न शिजविले जाते किंवा पदार्थ तयार केले जातात, त्या खोलीत गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी-जास्त असू शकते. हे पाहता तेथील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणांची तपासणी नियमित करावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

अग्निरोधक यंत्रणेची तपासणी आवश्यक
कोणत्याही रहिवासी अथवा व्यवसायिक इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली असते. मात्र, अनेक वेळा रहिवाशांकडून यंत्रणेची तपासणी वेळोवेळी केली जात नाही. विशेषत: तपासणी होत नसल्याने यंत्रणा सुरू आहे की बंद? याची माहिती मिळत नाही. परिणामी, ऐन वेळी दुर्घटना घडल्यास यंत्रणा नादुरुस्त असेल तर धोका वाढतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले, तसेच यासाठी अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Drones needed for fire control;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग