मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण घटले, मोदी सरकारचा शिक्षणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:42 AM2018-03-14T02:42:10+5:302018-03-14T02:42:10+5:30
शिक्षणापेक्षा मोठे कोणते मिशन असू शकत नाही. म्हणूनच केंद्र सरकारने शिक्षणावर आणि त्यातही अल्पसंख्याकांच्या शिक्षणावर भर दिला आहे.
मुंबई : शिक्षणापेक्षा मोठे कोणते मिशन असू शकत नाही. म्हणूनच केंद्र सरकारने शिक्षणावर आणि त्यातही अल्पसंख्याकांच्या शिक्षणावर भर दिला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळात घट होऊन ते ७०हून ४० टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण आम्हाला शून्य टक्क्यावर आणायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.
वांद्रे पश्चिमेकडील युवा अनस्टॉपेबल, तालीम-ओ-तर्बीयत यांच्या संयुक्त विद्यमाने अंजुमन-ए-इस्लाम विद्यालयातील शौचालय आणि पाण्याच्या सुविधांचे नूतनीकरण केल्यानंंंंंतर त्याचे उद्घाटन मंत्री नक्वी यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष जहीर काझी आणि मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिर्व्हसिटीचे कुलगुरू जफर सरेशवाला उपस्थित होते.
मंत्री नक्वी पुढे म्हणाले, काही मदरसांमध्ये शिक्षकांची कमी, शौचालयांची कमतरता, अस्वच्छता आणि अनेक सुविधांचा अभाव आहे. जे मदरसे आहेत त्यांना औपराचिक शिक्षण देण्यासाठी तीन ‘टी’चा फॉर्म्युला दिला गेला, त्यात शिक्षक, आहार आणि शौचालय. काही शैक्षणिक संस्थांच्या साहाय्याने मदरसांना शिक्षक पुरविण्यात आले आहेत. तसेच, पोषक आहार आणि शौचालयांची सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. अंजुमन-ए-इस्लाम शाळेसाठी कोणत्याही प्रकारची
मदत लागल्यास सरकार पाठीशी उभे राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.