मुंबई: वांद्रे पूर्व परिसरात हेल्मेटचे दुकान चालवणाऱ्या रामचंद्र रेड्डी (६२) यांना पिशवीत दोन सोन्याच्या वस्तू टाका आणि साईबाबांचा आशीर्वाद मिळवा असे सांगत जवळपास दीड लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी त्यांनी खेरवाडी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर अनोळखी भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
रेड्डी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका भामट्याने २२ सप्टेंबर रोजी दुकानांमध्ये हेल्मेट खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. त्यानंतर मोटर सायकलची चैन साफ करण्यासाठी लागणारा स्प्रे खरेदी करत रेड्डी यांना त्याचे पाचशे रुपये दिले. निघताना जवळपास साईबाबा चे मंदिर आहे का? अशी विचारणा रेड्डींना केली. मला साईबाबा मंदिरात अकराशे एक रुपयांचे अन्नदान करायचे असून आपली मंदिरात ओळख आहे का असेही रेड्डीना विचारले. बोलता बोलता तुम्हीच माझ्या तर्फे मंदिरात पैसे द्या असे सांगत त्याने प्लास्टिकच्या पिशवीत फुले टाकून ती पिशवी रेड्डींना दिली.
पैशासोबत सोन्याच्या दोन वस्तू ठेवल्यास साईबाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असेही तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत रेड्डी यांनी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी आणि चैन मिळून १ लाख ६० हजार ५०० रुपयांचे दागिने त्याच्या समोर पिशवीत ठेवले. हातचलाखीने ते दागिने पिशवीतून लंपास करत त्या भामट्याने पळ काढला. मुख्य म्हणजे तुम्ही अर्ध्या तासाने पिशवी उघडा असे तो रेड्डींना म्हणाला. रेडमी जेव्हा पिशवी उघडली तेव्हा त्यातील सोन्याची अंगठी आणि चैन गायब होती. या विरोधात त्यांनी खेरवाडी पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध सुरू आहे.