नोंदणीला खोडा
By admin | Published: September 13, 2014 01:51 AM2014-09-13T01:51:02+5:302014-09-13T01:51:02+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून ५५ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद केल्यानंतर जिल्हा निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान नोंदणीसाठी कंबर कसली आहे
चेतन ननावरे, मुंबई
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून ५५ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद केल्यानंतर जिल्हा निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान नोंदणीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी आयोगाने सर्वाधिक नवमतदार असलेल्या आणि विद्येचा प्रसार करणाऱ्या मुंबईतील ८७ महाविद्यालयांना मतदार नोंदणी अभियान राबवण्याचे आवाहन केले. मात्र त्यातील केवळ तीन महाविद्यालयांनीच मोहिमेला प्रतिसाद दिला असून, उर्वरित महाविद्यालयांनी अभियानाला ठेंगा दाखवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अधिकाधिक लोकांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मतदार नोंदणीचे अभियान सुरू केल्याचे उपजिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले. त्यात सर्वाधिक नवमतदार असलेल्या महाविद्यालय प्रशासनांना सामावून घेण्याचे ठरवले. त्यासाठी शहरांतर्गत येणाऱ्या ८७ महाविद्यालयांना नोटिसीद्वारे बैठकीचे आमंत्रण धाडण्यात आले. मात्र पहिल्याच बैठकीत महाविद्यालयांचा निरुत्साह दिसून आला. या बैठकीस २० टक्क्यांहून कमी म्हणजेच केवळ १७ महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाच्या हाकेला साद देणाऱ्या या महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांनी दोन विद्यार्थ्यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नेमणूक करण्याचे ठरवले. तर अभियानावर देखरेख ठेवण्यासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या. देखरेख ठेवणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकाला नोडल अधिकाऱ्याचे अधिकारही आयोगाने दिले.