मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकृतपणे दुष्काळ जाहीर होण्याची वाट न पाहता दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजना तातडीने लागू करण्यात येणार आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती मंगळवारी दिली.
दुष्काळी तालुक्यांमध्ये महसूल फी, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणे, कृषी पंपाचे ३३.५ टक्क्के वीज बिल माफ करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त कामे देणे या उपाययोजना तत्काळ लागू करण्यात येणार आहेत.
राज्यात उपग्रहाद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून १७९ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत दुष्काळाची भीषणता मंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहणी कारवाई आणि त्यासंबंधीचे अहवाल आपल्याकडे द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील बैठकीत दिले होते.
बैठकीत सहा ते सात मंत्र्यांनी दुष्काळाच्या दाहकतेची माहिती दिली. पिण्याच्या पाण्याची स्थिती सरावाधिक गंभीर असल्याचे सरावाचे म्हणणे होते. राज्यात १ हजार गावांमधील पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्णावस्थेत आहेत. त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जय गावांमध्ये पाणी पुरवठा योजना तातडीने उभारत येतील, त्याची यादी करून तेथे तात्काळ कामे सुरु करण्यात येणार आहेत.