मुंबई/पुणे : पावसाळ्यातील चार महिन्यांत कोकण, मध्य महाराष्ट्रात धो धो बरसलेल्या मान्सूनची वक्रदृष्टी मराठवाड्यावर कायम राहिली असून, सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़ राज्यातील सरासरीच्या ३३ टक्के जादा पावसाची नोंद झाली असली, तरी १० जिल्ह्यात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही.उशिरा सुरू झालेला मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही़ येत्या दोन दिवसांत मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू होण्याची शक्यता आहे़ मान्सून उशिरा आला, तरी त्यानंतर तो देशभरात बहुतांश ठिकाणी अखंड बरसत राहिला आहे़ त्यामुळे यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात सातत्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती़ साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत सर्व भागाला महापुराशी सामना करावा लागला होता़ याच काळात मराठवाडा व विदर्भ मात्र पावसाकडे आस लावून बसला होता़ मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड वगळता अन्य सर्व ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ बीडमध्ये २७ टक्के, लातूरमध्ये २१ टक्के, हिंगोलीत १७ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस जादा झाला असला, तरी २९ सप्टेंबरअखेर यवतमाळ येथे सरासरीच्या ३० टक्के, वाशिममध्ये २० टके, आणि गोंदियामध्ये ४ टक्के कमी पाऊस पडला आहे़ गडचिरोलीमध्ये सरासरीपेक्षा ४६ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ त्याखालोखाल नागपूरमध्ये २७ टक्के अधिक पाऊस बरसला आहे़ मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५६ टक्के अधिक पाऊस झाला असून त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा १११ टक्के विक्रमी पाऊस झाला आहे़ कोल्हापूर ७० टक्के, धुळे ८२ टक्के, नाशिक ६७ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ सोलापूर या पर्जन्यछायेतील जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के पाऊस कमी पडला आहे़ कोकणात सरासरीच्या ५३ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ त्यात पालघरमध्ये यंदा अतिवृष्टी होऊन ६९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. कोकणातील सर्वच जिल्ह्यात अधिक पाऊस बरसला .देशात ९ टक्के जादा१ जून ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९५६.१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ९ टक्के अधिक आहे. सरासरी म्हणजे सर्वसाधारणपणे देशभरात या कालावधीत ८७७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद होते. तर महाराष्ट्राचा विचार करता १ हजार ३२५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ३३ टक्के अधिक आहे. राज्यात सर्वसाधारणपणे या कालावधीत ९९९.८ मिलीमीटर पाऊस होतो.१ जून ते २९ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस (टक्केवारी) : औरंगाबाद- ५, बीड - उणे २७, हिंगोली - उणे १७, जालना -उणे १२, लातूर -उणे २१, उस्मानाबाद -वजा १४, परभणी - उणे १, गोंदिया - उणे ४, वाशिम - उणे २०, यवतमाळ - उणे ३०, सोलापूर - उणे ३७ टक्के़सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : पुणे १११, धुळे ८२, कोल्हापूर ७०, पालघर ६९, मुंबई उपनगर ६७, ठाणे ६८, नाशिक ६७
मराठवाड्यावर दुष्काळाची छाया, १० जिल्ह्यांत तूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:00 AM