मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाळ्यात ड्रोनची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:33 AM2019-05-15T01:33:03+5:302019-05-15T01:33:05+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरही लक्ष ठेवून त्याद्वारे उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पाणी साचण्याच्या, घाटाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासह सुरक्षेसाठी तिसºया डोळ्याचे काम ड्रोन करणार आहे. सर्व स्थानकांवरील आणि स्थानकांच्या परिसराचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाईल. अपघात, सुरक्षा यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन, लोकल सेवा आणि दुर्घटनेवर नियोजन करणे शक्य होणार आहे.
मान्सून काळात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोड ते चर्चगेट या ३७ स्थानकांवरील प्रत्येक घडामोडीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात जास्त प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला. पाणी साचत असल्याने रेल्वे सेवादेखील विस्कळीत होण्याचे प्रकार पावसता अनेकदा घडतात. हे सर्व टाळून योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी आता या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे रेल्वे मार्गावर पाणी भरण्याचे मुख्य ठिकाण केंद्रित करून त्यावर तत्काळ उपाययोजनादेखील करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील ११५ स्थानकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार सीएसएमटी ते इगतपुरी, लोणावळा आणि रोह्यापर्यंत ड्रोनद्वारे घाटातील परिसर, गर्दीची ठिकाणे यावर लक्ष ठेवले जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मशीद, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा, सायन, कुर्ला, विद्याविहार येथे मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करून यंदाच्या मान्सूनची तयारी सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाची ही मान्सूनपूर्व तयारी लक्षात घेता निदान यंदा मुसळधार पावसात रेल्वेचा प्रवास विनाविलंब, सुरक्षित होईल, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
जूनपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन
ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पावसाळ्यापूर्वी जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासह मान्सून काळात याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे दुर्घटनेच्या ठिकाणी तेथील परिस्थितीचा आढावा ड्रोनद्वारे घेतला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.