मरोळ पोलिस कॅम्पमध्ये नशेबाजांचा धुडगूस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:57 AM2023-05-31T07:57:40+5:302023-05-31T07:57:59+5:30
नागरिक झाले हैराण, पोलिस चौकीची मागणी
मुंबई : मरोळ पोलिस कॅम्पच्या आसपास असलेल्या कनाकिया रेन फॉरेस्ट भवानीनगर, संगीतकार श्रीकांत ठाकरे मार्ग, भारत वन उद्यान ते कस्टम कॉलनी परिसरात नशेबाजांचा हैदोस सुरू असून, त्यांच्या उच्छादामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिस बीट चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पवई पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पवई उद्यान बीट क्रमांक १ चौकीच्या अखत्यारीत हा परिसर येतो. मात्र, ही बीट चौकी या परिसरापासून सुमारे दोन ते तीन किमी दूर आहे. चौकीपासून या ठिकाणी पोहचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. याचे कारण म्हणजे मेट्रोचे काम सुरू असून, महत्त्वाचे रस्ते बंद असल्याने येथे कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी असते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्यांच्या पासपोर्ट पडताळणीसह अन्य कामांसाठी पवई पोलिस ठाण्यात ये-जा करणे गैरसोयीचे ठरते. शिवाय मरोळ कनाकिया रेन फॉरेस्ट, शेलार जिम, भवानीनगर, भारत वन उद्यान आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नशेबाजांचा वावर असतो. त्यांच्यावर पाेलिसांचा कोणत्याही प्रकारे वचक नसल्याने ते आता स्थानिक लोकांनाही जुमानत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पवई पोलिस ठाण्यांतर्गत येणारा हा परिसर आडबाजूला असल्याने या परिसरात निगराणी कमी पडते. सोनसाखळ्या हिसकावणे, चोऱ्या, हाणामारीसारखे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही येथे वाढले आहे. या परिसराला एमआयडीसी पोलिस ठाण्याचा बरासचा भाग जोडून असल्याने पवई पोलिस ठाण्याचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिस गस्त फार कमी प्रमाणात होत असल्याने असुरक्षिततेचे, भीतीचे व दहशतीचे वातावरण असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.
- मरोळ पोलिस कॅम्प - कनाकिया रेन फॉरेस्ट - भवानीनगर - स्व. संगीतकार श्रीकांतजी मार्ग - भारत वन उद्यान ते कस्टम कॉलनी परिसराकरिता स्वतंत्र बीट चौकी मिळावी.
- या परिसरास लागूनच एमआयडीसी पोलिस ठाण्याचा बराचचा परिसर आहे. एमआयडीसी पोलिस ठाणे त्यांच्या बीट चौकी या परिसरालगत असून, स्थानिकांना तेथे पोहोचणे खूप सोयीस्कर आहे. त्यामुळे हा परिसर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जोडावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
या परिसरातील नागरिक व पोलिसांचा संपर्क तसेच पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी. तसेच सोसायटी, चाळ इत्यादी परिसर हे जास्तीत जास्त पोलिसांच्या संपर्कात राहण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. या भागातील नशेबाजांवर सातत्याने आणि प्रभावी कारवाई झाल्यास त्यांच्याबद्दल स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेली भीती नष्ट होऊन ते निर्भयपणे वावरू शकतील.
- रोहन सावंत,
मनसे अंधेरी विभाग अध्यक्ष