मुंबई: देशात अनधिकृतपणे होणाऱ्या आॅनलाईन फार्मसीविरुद्ध रणशिंग फुंकत आठ लाख औषध विक्रेत्यांनी १४ आॅक्टोबरला संपाचा इशारा दिला आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टतर्फे देण्यात आली. आॅनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या औषधविक्रीत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिली जातात. या माध्यमातून झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ््या, नार्कोटिक्स ड्रग्ज, कोडीन सीरपसारखी औषधे जास्त प्रमाणात घेतल्यास, जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या औषधांची आॅनलाईन खुलेआमपणे विक्री होते. गेल्या तीन वर्षांपासून सतत सरकारकडे या विषयीचा पाठपुरावा करत असूनही याला आळा बसलेला नाही. याचा निषेध म्हणून १४ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. तथापि, सरकारने या विषयाकडे गांभीर्याने न पाहिल्यास बेमुदत संप केला जाईल, असे असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश गुुप्ता यांनी सांगितले.अनधिकृतपणे चालू असलेल्या आॅनलाईन औषधविक्रीला आळा घालणे, औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेचा बचाव करणे, कमी दर्जाची अप्रमाणित, डुप्लिकेट औषधे विकण्याचा धोका अधिक, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री या कारणांसाठी असोसिएशनचा विरोध आहे. आॅनलाईन औषधविक्रीत असणाऱ्या उणिवांची गंभीर दखल घ्यावी, ही प्रमुख मागणी असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
औषध विक्रेत्यांचा बुधवारी देशव्यापी संप
By admin | Published: October 12, 2015 5:09 AM