औषध कोंडी सुरूच; औषध वितरकांच्या आंदोलनाचा सातवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:36+5:302020-12-22T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारच्या खरेदी कक्षाकडून कोट्यवधींची देयके थकविल्याने राज्यातील १०० पेक्षा अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या खरेदी कक्षाकडून कोट्यवधींची देयके थकविल्याने राज्यातील १०० पेक्षा अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषध वितरण बंद केले. त्यापाठोपाठ आता स्थानिक पातळीवरील वितरकही रुग्णालयांना औषधपुरवठा करण्यास नकार देत या आंदोलनात सहभागी झाले आहेत. चार वर्षांपासून थकीत असलेली देयके दिल्याशिवाय औषधे देणार नसल्याचा निर्णय स्थानिक वितरकांनी घेतला आहे. सोमवारी आंदोलनाचा सातवा दिवस होता. वितरक मागण्यांवर ठाम आहेत.
औषध वितरकांची हाफकिन प्रशासनासह याविषयी बैठक पार पडली, मात्र बैठकीत ताेडगा न निघाल्याने औषध वितरकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. औषध वितरकांकडून पुरवठा थांबविण्यात आल्यावर किंवा खरेदी कक्षाकडून औषधांचा पुरवठा वेळेवर न झाल्यास रुग्णालयांना स्थानिक पातळीवरील वितरकांकडून औषधे खरेदी करता येतात. मात्र स्थानिक वितरकांचीही चार वर्षांची देयके रुग्णालयांकडून प्रलंबित आहेत. त्यामुळे औषध वितरकांच्या आंदोलनामध्ये आता स्थानिक वितरकांनीही उडी घेतली आहे. देयके मंजूर केल्याशिवाय औषधांचा पुरवठा करण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच औषधे हवी असल्यास ‘पैसे घेऊन या, आणि औषध न्या’ असे धोरण त्यांनी अवलंबले आहे, अशी माहिती ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.
.................................................................