व्ही. एन. देसाई रुग्णालयातील प्रकार; ‘लोकमत’च्या पाहणीतून उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रुग्णालयांत गरीब रुग्णांच्या सोयीसाठी औषध वितरण विभाग सुरू करण्यात आला आहे. नियमानुसार ही सुविधा २४ तास सुरू ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील औषध वितरण विभाग रात्री आठ वाजल्यानंतर बंद केला जात असल्याची बाब ‘लोकमत’च्या पाहणीतून समाेर आली.
सांताक्रुझ, खार आणि विलेपार्ले परिसरातील रुग्णांसाठी व्ही. एन. देसाई रुग्णालय आधार ठरत आहे. दर्जेदार रुग्णसुविधा मिळत असल्यामुळे गरिबांसह मध्यमवर्गीय लोकही येथे उपचारासाठी येतात. परंतु, या रुग्णालयातील औषध वितरण विभाग रात्री आठ वाजल्यानंतर बंद होत असल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. गरिबांसाठी पालिकेने मोफत औषधांची योजना सुरू केली असूनही रात्री औषध वितरण विभाग बंद हाेत असल्याने खासगी मेडिकलमधून औषधे विकत घ्यावी लागत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.
वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना वेळेत औषधे मिळतात. परंतु, रात्री आठ वाजल्यानंतर कॅज्युल्टीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा नाही, तरीही रात्रपाळीसाठी माणूस नेमला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागाचे कर्मचारी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी शिफ्ट करतात. विभागाच्या हजेरीपटावर तीन पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही का, असाही सवाल उपस्थित होत आहे. याबाबत रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रशांत मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
* स्वच्छतेचे काय?
- व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वॉर्ड आणि आवाराची स्वच्छता वेळच्या वेळी केली जाते. मात्र, शौचालयांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून आले.
- वॉर्ड आणि जिन्यांचे कोपरे पिचकाऱ्यांनी माखलेले होते. कचराकुंड्यांमध्येही पान-गुटखा खाऊन थुंकल्याचे प्रकार निदर्शनास आले.
- केसपेपर काढण्यासाठी रांगेचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले जाते. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी सुरक्षारक्षक वेळोवेळी सूचना करताना दिसतात.
- तळमजल्यावरील पाणपोईची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सोबत पाण्याची बाटली न आणलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे.
...........................................................