अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई

By सीमा महांगडे | Published: October 25, 2023 08:06 PM2023-10-25T20:06:03+5:302023-10-25T20:06:21+5:30

मुंबईतील ४५० शाळांमध्ये राबविणार अभियान

Drug free Mumbai to get rid of drug addiction | अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई

अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई

मुंबई:मुंबईलाअमली पदार्थ आणि त्यांच्या विक्रीचा मोठा विळखा बसला असून शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात ड्रग्ज फ्री अभियानाची सुरुवात केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण विभागाच्या 'स्वच्छता मॉनिटर' प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून याच धर्तीवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

बुधवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिकेच्या पत्रकार कक्षात या मोहिमेसंदर्भात माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते.  मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. त्याबरोबरच आंतरिक स्वच्छता देखील आवश्यक आहे. विद्यार्थी संवेदनशील असतात, त्यांच्या सहभागातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ड्रग्ज मुक्त मुंबई अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करायलाच हवी मात्र ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांत यासंदर्भात जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यामध्ये पालिका शाळांचा सहभाग ही असणार असल्याचे त्यांनी  सांगितले. मुंबईमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगण्यासोबतच अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कार्यवाही राबविण्याची सूचना त्यांनी केली. मुंबईतील ४५०  शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत दहा मुले व दहा मुली यांचा स्टुडंट्स प्रहरी क्लब स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘एक युद्ध नशे के विरूद्ध’
व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत 'स्टुडंट्स प्रहरी क्लब'चा शुभारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रवींद्र सिंघल, नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते. विद्यार्थी नशेसारख्या सवयींना लवकर बळी पडण्याची शक्यता असल्याने मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी क्षीरसागर सांगितले. विद्यार्थी वाईट सवयींना बळी पडू नयेत ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी या अभियानाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘एक युद्ध नशे के विरूद्ध’ ही या अभियानाची घोषणा असणार आहे.

Web Title: Drug free Mumbai to get rid of drug addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.