एनसीबीचा कयास
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्ज माफिया करीम लाला हा मुंबई महानगर परिसरात मेफेडरोडीन (एमडी) या ड्रग्ज तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचा कयास अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) मुंबईच्या पथकाकडून वर्तविला जात आहे. जवळपास ६० हस्तकांमार्फत तो बॉलीवूडसह शहर व उपनगरात त्याचे रॅकेट चालवीत असल्याची बाब समोर आली आहे. फरारी करीमच्या शोधासाठी एनसीबीबरोबर अन्य तपास यंत्रणाही कार्यरत आहेत. मात्र त्यांना अद्याप त्याचा ठावठिकाणा शोधता आलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीम लाला हा एमडी तस्करीचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांचे नेटवर्क एमएमआरडीए परिसरात कार्यरत आहे. त्याचे सुमारे ६० ड्रग पेडलर असून ते फक्त एमडी पुरवतात. गेल्या तीन महिन्यांमध्ये एनसीबीने टाकलेल्या छाप्यामध्ये एमडी तस्कराकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यानुसार कुर्ल्यात राहात असलेला करीम लाला हा मुंबईत स्ट्रगल कलाकार आणि इतर छोट्या कलाकारांना एमडी पुरवण्यात सक्रिय होता. त्यानंतर त्याचे हस्तक हे काम करतात. वांद्रे येथे कपड्याच्या व्यवसायातून त्याने एमडी तस्कराचे रॅकेट चालू केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.