सोशल मीडियावर ड्रग्ज बाजार, ‘डार्क नेट’चे तरुणाईवर जाळे; इन्स्टाग्राम, व्हॉटस् ॲप, फेसबुकवर खास ग्रुप
By मनोज गडनीस | Published: December 14, 2023 06:47 AM2023-12-14T06:47:05+5:302023-12-14T06:47:48+5:30
रेव्ह पार्ट्यांचे होते आयोजन
मनोज गडनीस
मुंबई : गेल्या काही वर्षांपर्यंत खास ओळखीच्या नेटवर्कमधून चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवसायाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उदयाने मोठी शक्ती मिळाली आहे. विशेषतः डार्क नेट आणि अलीकडच्या काळात विस्तारलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण अमली पदार्थांची विक्री तसेच रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याचे दिसून आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ या वर्षाचा वर्ल्ड ड्रग्ज अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थांचे व्यवहार करण्यामध्ये प्रामुख्याने १६ ते २४ या वयोगटातील युवक सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. याखेरीज व्हॉटस् ॲपद्वारे देखील अमली पदार्थांची तस्करी झाल्याचे आढळून आले आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट या काही प्रमुख माध्यमांद्वारे ही तस्करी होत आहे. फेसबुकसारख्या माध्यमात अनेक जण खासगी ग्रुप तयार करून त्याद्वारे अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची माहिती देत असल्याचेही तपास यंत्रणांना आढळून आले आहे. अशा समूहात एखाद्या रेफरन्सशिवाय शिरकाव करणे कठीण असते. म्हणूनच हे समूह तपास यंत्रणांच्या पुढील डोकेदुखी झाल्या आहेत.
...तरच युझर नेम, पासवर्ड मिळतो
सर्वेक्षणानुसार, २५ ते ३४ वयोगटातील मुले ही इंटरनेटवरील डार्क नेटवरून केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत आहेत.
इंटरनेटच्या अथांग विश्वात अशा अनेक वेबसाइट आहेत जिथपर्यंत सर्च इंजिनला देखील पोहोचणे शक्य होत नाही. त्या महाजालात समांतर जाळे उभारत डार्क नेट उभारले जाते.
इथे सर्वांना प्रवेश मिळत नाही. तुमच्याकडे काही संदर्भ असेल तरच तिथल्या वेबसाइटचा युझर नेम व
पासवर्ड तुम्हाला प्राप्त होतो. त्यानंतर इथून अमली पदार्थांचे व्यवहार होतात.
रील्समधून सूचक संदेश
इन्स्टाग्रामवरून होणारी तस्करीचा ट्रेन्ड गेल्या दीड-दोन वर्षांत जास्त प्रमाणात विकसित झाला आहे.
रील्स, तसेच स्टेटस अपडेट करून सूचक संदेश देत तरुणांना आकर्षित करण्यात येत आहे.
ही सोशल मीडिया हँडल खरी कोणाची आहेत व कोणत्या देशांतून ती चालवली जातात, त्यांचा आयपी ॲड्रेस काय, अशा शोधासाठी देखील तपास यंत्रणांना जंगजंग पछाडावे लागत आहे.
व्यवहार होतात बिटकॉईनद्वारे
हे व्यवहार प्रामुख्याने बिटकॉईन या आभासी चलनाद्वारे केले जातात. दोन महिन्यांपूर्वी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने डार्क नेटद्वारे झालेल्या अमली पदार्थांच्या खरेदीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. ज्या मुंबईतल्या तरुणांनी याची डार्क नेटद्वारे खरेदी केली होती त्यांना ते अमली पदार्थ परदेशी पोस्टाद्वारे पाठवण्यात आले होते.