Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझवर आयोजित करण्यात आलेली ड्रग्ज पार्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावली. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोन जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी आणि आयोजकांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत क्रूझवर बरीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कुणीही मास्क परिधान केलेला नव्हता. याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची तिथं उपस्थिती होती. मग याची परवानगी कुणी दिली? क्रूझवरील पार्टीच्या नियमाचे नियम काय आहेत आणि याच्या परवानगी बाबतचे अधिकार कुणाच्या अखत्यारित येतात या सर्व बाबींची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत. राज्यात कोरोना संदर्भातील नियम लागू आहेत. यात मुंबईत पाचपेक्षा अधिक जणांना एका ठिकाणी जमा न होण्याचे आदेश आहेत. असं असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक क्रूझवर आले कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
क्रूझवरील पार्टी प्रकरणी एनसीबीकडून अमली पदार्थांच्या सेवनाच्या दृष्टीनं चौकशी केली जात आहे. तर मुंबई पोलिसांकडून आता या पार्टीच्या परवानगीच्या बाजूनं चौकशीला सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांच्या एन्ट्रीनं पार्टीच्या आयोजकांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.