एलएसडी, गांजा, एमडीसह हशीश जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एनसीबीने गेल्या १२ तासांत मुंबईत केलेल्या तीन कारवाईत एमडी, एलएसडी, हशीशसारखे घातक अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी सहा जणांवर कारवाई केली. ते डार्कनेटवरून ड्रग्जची खरेदी करत तरुणांना त्याची विक्री करत होते. एनसीबीने या कारवाईत एलएसडीच्या १२३ बॉटल्स, ३० ग्रॅम गांजा, १०.२ ग्रॅम एमडी आणि हशीश जप्त केले.
पहिल्या कारवाईत एनसीबीने गुरुवारी ओशिवरा येथे छापा टाकून झैद राणा आणि सोनू फैझ यांना ताब्यात घेत ७० बॉटल्स एलएसडी, ३० ग्रॅम गांजा आणि चरस जप्त केले. दोन्ही आरोपींच्या चौकशीतून एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला बॅक रोड येथून शुभम सावर्डेकर ऊर्फ थापा याला हशीश याला अमली पदार्थासह ताब्यात घेतले. तर, दुसऱ्या कारवाईत ५३ एलएसडी, १०.२ ग्रॅम एमडी जप्त केले. या कारवाईत रवी वाघेला, हर्षद वाघेला, शरद पारगी यांना ताब्यात घेतले. तिघेही विरार भागातीत रहिवासी आहेत.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत घातक असलेल्या ड्रग्ज पैकी एलएसडी, डीएमटी, अमेरिकन कॅन्नाबीस यांना बड नावाने ओळखले जाते. कॅन्नाबीस हे डब म्हणूनसुद्धा ओळखले जाते. डार्क नेट वेबसाईटच्या माध्यमातून हे ड्रग्ज मिळवले जाते. ड्रग्ज मिळवण्याचा हा पहिला टप्पा असून विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा संपर्क साधला जातो. या साईटवरून मागविलेले ड्रग्ज पुरवठा करणारे वेगवेगळे वितरक उपलब्ध आहेत. ते आपली खरी ओळख उघड करत नाहीत. ते बनावट नाव आणि अज्ञात मेसेंजरचा वापर करतात. ड्रग्जची आवश्यकता असलेला ग्राहक हा या मेसेंजरच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून ड्रग्जचा पुरवठा आणि किंमत ठरवतो. ड्रग्जच्या ऑर्डरप्रमाणे सांगितलेल्या पत्त्यावर ड्रग्ज पोहोच केले जाते. याचे पेमेंट बिट कॉईनसारख्या क्रिप्टो करन्सी किंवा मध्यस्थ अन्यथा दलालाच्या माध्यमातून थेट वेबसाईटवर केले जाते.
.......................