एनसीबीची कारवाई; नशेच्या पाच हजार गोळ्या जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) पथकाने कुर्ल्यात छापा टाकून नशेसाठी वापररल्या जाणाऱ्या, बंदी असलेल्या ४ हजार ८२४ ट्रामाडोल या गोळ्या जप्त केल्या. त्या मुंबईत विक्रीसाठी पाठविलेल्या महंमद अनस या तरुणाला सोमवारी दिल्लीतून अटक केली. ड्रग्ज विक्री व तस्करीच्या अन्य चार गुन्ह्यांत तो संशयित आरोपी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनसीबी मुंबई विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रविवारी कुर्ला (प.) कमानीजवळच्या गोल्डन पॅलेस हॉटेल येथील प्रोफेशनल कुरियर युनिट या दुकानात त्यांनी छापा टाकला. तेथे एका पार्सलमध्ये ट्रामाडोलच्या ४,८२४ गोळ्या सापडल्या. त्याचे वजन २.६१३ किलो होते. या गोळ्या दिल्लीतील महमद अनसने पाठविल्याचे स्पष्ट झाल्याने, एक पथक तातडीने तेथेे रवाना करून त्याला अटक करण्यात आली. एनसीबीकडील अन्य ४ गुन्ह्यांत आरोपी असल्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.
ट्रामाडोल हे वेदनाशमक औषध असून, त्याच्या विक्रीला बंदी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते दिले जात होते. मात्र, त्याचा वापर नशेसाठी केला जात असल्याने त्यावर निर्बंध घालण्यात आले.
..........................