एनसीबीचा अंधेरीत छापा : पाच किलो चरससह अडीच कोटींची रोकड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) बुधवारी सकाळी अंधेरी परिसरात छापा टाकून ड्रग्ज तस्कर रंगेल महाकाल याला अटक केली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीचे पथक त्याच्या शोधात होते. राजपूतप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर अनुज केशवानी याच्याशी त्याचे संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले. छाप्यात अडीच कोटी रोकडसह एकूण ५ किलो चरस जप्त करण्यात आला.
सुशांतच्या मृत्युप्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक, तसेच तस्कर केशवानीला अटक केली. त्यावेळी महाकालचे नाव पुढे आले होते. सुशांतला लागणारे ड्रग्ज तो केशवानीला पुरवित होता. त्यानंतर, त्याच्यामार्फत ते त्याला मिळत असल्याचे तपासातून समोर आले होते. तेव्हापासून महाकाल एनसीबीच्या रडारवर होता. त्याच्या अटकेमुळे ड्रग्जशी संबंधित बॉलीवूडमधील अन्य नावे पुढे येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* आराेप फेटाळले
एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, महाकालने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात आपल्याला गुंतविण्यात आल्याचा त्याने आरोप केला.