ड्रग्ज तस्कराने एनसीबी अधिकाऱ्याला नेले २०० मीटर फरफटत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:46+5:302021-05-22T04:06:46+5:30
मुंबईत रंगला पाठलागाचा थरार...फिल्मी स्टाईलने एक जण जाळयात ड्रग्ज तस्कराने एनसीबी अधिकाऱ्याला नेले २०० मीटर फरफटत मुंबईत रंगला ...
मुंबईत रंगला पाठलागाचा थरार...फिल्मी स्टाईलने एक जण जाळयात
ड्रग्ज तस्कराने एनसीबी अधिकाऱ्याला नेले २०० मीटर फरफटत
मुंबईत रंगला पाठलागाचा थरार...फिल्मी स्टाईलने एकजण जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘एनसीबी’ची ड्रग्ज तस्करावर धडक कारवाई सुरू असताना, अंधेरी येथे एका कारवाईत ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा पाठलाग करताना दोन अधिकारी जखमी झाले. यात एका ड्रग्ज तस्कराने अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची एखाद्या हिंदी चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे रंगणारी घटना गुरुवारी घडली. यात एका तस्कराला अटक करण्यास एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.
एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अंधेरीच्या वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट रोड परिसरात ३ तस्कर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. तस्कर ड्रग्ज देण्यासाठी दुचाकीवरून तेथे धडकताच पथकाने त्यांच्याकडे धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. जवळपास अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करूनही दोन तस्कर पळण्यास यशस्वी झाले, तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याने अन्य एका तस्करावर झडप घातली. एनसीबीच्या अधिकाऱ्याने त्याला पकडताच त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्या अधिकाऱ्याला फरफटत नेत पळ काढला. यात तो अधिकारी जखमी झाला आहे.
तर आणखी एका तस्कराने दुचाकीवरून उडी घेत रहिवासी इमारतीच्या दिशेने पळ काढला. अधिकाऱ्याने त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. या दरम्यान तस्कराने अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अधिकारी जखमी झाला. मात्र, त्याने तस्कराला बेड्या ठोकल्या.
त्याच्याकड़ून ६२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे.