मुंबईत ड्रग्ज तस्कराचा एनसीबीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, दोन अधिकारी जखमी
By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 01:44 PM2020-11-23T13:44:15+5:302020-11-23T13:56:45+5:30
गोरेगाव येथे तब्बल ६० जणांच्या टोळक्याने वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई
मुंबईच्या गोरेगाव परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकावर ड्रग्ज तस्करांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह आणखी एक जण जखमी झाल्याचं समजतं.
धक्कादायक बाब म्हणजे गोरेगाव येथे तब्बल ६० जणांच्या टोळक्याने वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीचे पाच जणांचे पथक कॅरी मेंडीस नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी कॅरी मेंडीस आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींविरोधात आयपीसी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra: Three people arrested in connection with the incident where NCB Zonal Director Sameer Wankhede and his team were attacked allegedly by drug peddlers in Goregaon, Mumbai last evening. Two officers were injured. Further investigation is underway.
— ANI (@ANI) November 23, 2020
एनसीबीच्या याच पथकाने शनिवारी कॉमेडी किंग भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा मारला होता. यावेळी भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. भारती आणि हर्ष दोघंही आता तुरुंगात असून त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना रविवारी कोर्टाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली या दोघांनी दिली असल्याचं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.