डी गँगशी संबंधित ड्रग्ज तस्कराला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:10 AM2021-09-10T04:10:13+5:302021-09-10T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम टोळीशी संबंधित ड्रग्ज तस्कर मोहम्मद आरीफ याला राष्ट्रीय अंमली पदार्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम टोळीशी संबंधित ड्रग्ज तस्कर मोहम्मद आरीफ याला राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) रे रोड येथून ताब्यात घेत अटक केली आहे. एनसीबीने त्यांच्याजवळून १० लाख रुपयांचे एमडी जप्त केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका ड्रग्ज प्रकरणासह तीन गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता.
एनसीबीने डी गॅंगचे मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात करत जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात डोेंगरीतील ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये एनसीबीने माफिया डॉन करीम लाला याचा नातू आणि मुंबईतील ड्रग्ज डीलर परवेझ खान उर्फ चिंकू पठाण याला अटक केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ तपास यंत्रणेला चकवा देणाऱ्या मोहम्मद जमान हिदायतुल्ला खान उर्फ सोनू पठाण यालाही मैत्रिणीला भेटायला आला असताना जेरबंद केले. याच दरम्यान डी गँगच्या ड्रग्ज सिंडिकेटमधील तस्कर मोहम्मद आरीफ हा या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता. बुधवारी तो रे रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच एनसीबीने सापळा रचून आरीफला अटक केली. त्याच्याकडे १० लाखांचा एमडी सापडला आहे.