औषधांच्या तस्करीचा एनसीबीकडून पर्दाफाश
By मनोज गडनीस | Published: October 3, 2023 07:36 PM2023-10-03T19:36:00+5:302023-10-03T19:37:27+5:30
१५ हजार गोळ्या, ९६९६ कफ सिरप बाटल्यांचा साठा जप्त, चौघांना अटक
मनोज गडनीस
मुंबई - अवैधरित्या औषधांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोला (एनसीबी) यश आले असून या दरम्यान या औषधांचा शेकडो किलो साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. तीन स्वतंत्र घटनांत अधिकाऱ्यांनी एकूण चार जणांना अटक केली आहे.
या चारही जणांना यापूर्वी देखील तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या तीन प्रकरणांपैकी पहिल्या प्रकरणात, भारतातून अमेरिकेत नशेसाठी काही औषधे जात असल्याची विशिष्ट माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली व लखनौ येथील एक कंपनी यामध्ये गुंतली असल्याची माहिती पुढे आली. या कंपनीने मुंबईतून औषधांच्या १५ हजार गोळ्या अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली होती. या गोळ्या चहाच्या बॉक्समध्ये दडविण्यात आल्या होत्या.
या प्रकरणी लखनौस्थित समर एस. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यापैकी दुसऱ्या प्रकरणात, भिवंडी येथील रवीश एन. नावाची व्यक्ती गुजरात येथून मोठ्या प्रमाणावर कफ सिरपच्या बाटल्या जमा करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे रवीश एन हा भिवंडी - निझामपूर महानगर पालिकेचा कर्मचारी आहे. मुंबई व परिसरात या कफ सिरप बाटल्यांचे वितरण होणार होते. २८ सप्टेंबर रोजी या कफ सिरपचा मोठा साठा आकाश जी नावाची व्यक्ती घेऊन आली.
ही व्यक्ती रवीश एन. याच्यासोबतच काम करत होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी छापेमारी करत तब्बल ८४९७ कफ सिरप बाटल्यांचा साठा जप्त केला. तर तिसऱ्या प्रकरणात, गुजरात येथूनच मुंबईतील डोंगरी येथे ११९९ कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथेही छापेमारी करत अधिकाऱ्यांनी हा माल जप्त केला आहे.