लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाइंड ललित पाटील याची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सहआरोपी सचिन वाघ याच्याही पोलिस कोठडीत दंडाधिकाऱ्यांनी वाढ केली आहे.
पोलिसांतर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ड्रग्जचे रॅकेट फार खोलवर पसरले आहे. ललित पाटील हा रुग्णालयातून ड्रग्जचे रॅकेट चालवायचा. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीची मुदत वाढविण्यात यावी. पाटील याच्यासह सहआरोपी सचिन वाघ यालाही अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले. त्यावेळी दंडाधिकाऱ्यांनी दोघांच्याही कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
ललितच्या भावाची कारागृहात रवानगी
ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. मात्र, न्यायालयीन कोठडी देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना नसल्याने हा गुन्हा एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात वर्ग करून न्यायालयीन कोठडीची ऑर्डर घेण्यात आली.
ललितची प्रेयसी प्रज्ञा कांबळेला केले आरोपी
पुणे : ड्रग तस्कर ललित पाटीलची प्रेयसी ॲड. प्रज्ञा कांबळे हिने बेकायदा अमली पदार्थ विक्रीतील पैशांचा विनियोग केला असून, तिला गुन्ह्यातील सर्व गोष्टी माहिती असूनही तिने त्या लपविल्या. या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) सोमवारी आरोपी करण्यात आले. तिच्यावर आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते. आता तिच्यावर कटाच्या षडयंत्रात सहभागी होण्याबरोबरच ‘एनडीपीएस’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.