Join us  

अमली पदार्थ तस्करी; पाच जणांना अटक, एनसीबी मुंबईची पुणे व गोव्यात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 6:52 AM

हे अमली पदार्थ आंध्र प्रदेश आणि बिहार येथून पुण्यामध्ये येत असल्याचे आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एका आंतरराज्यीय टोळीतर्फे पुण्यामध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने पुण्यातून तीन जणांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ आंध्र प्रदेश आणि बिहार येथून पुण्यामध्ये येत असल्याचे आढळले. तर दुसऱ्या घटनेमध्ये कोकेनच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पुण्याची रहिवासी असणारी सागर. बी. नावाची व्यक्ती अवैध औषधे व अमली पदार्थांच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या अनुषंगाने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी सागरची चौकशी केली असता, त्याने या तस्करीची कबुली दिली आणि हे अमली पदार्थ स्वराज बी. नावाच्या व्यक्तीसाठी आणल्याची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्वराजला ताब्यात घेतले. स्वराज याचे पुण्यात मेडिकलचे दुकान असून, त्या दुकानातूनच तो या अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. या तिघांनाही एनसीबीने अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १ किलो कोकेनच्या तस्करीप्रकरणी गोव्यातून दोघांना अटक केली आहे. यामध्ये एका परदेशी व्यक्तीचा समावेश आहे. केनियाचा रहिवासी असलेल्या सॅम्युअल नावाच्या व्यक्तीकडे संशयास्पद सामान असल्याचा संशय गोवा विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्याकडे १ किलो कोकेन असल्याचे आढळले. तो दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून दुबईमार्गे भारतात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी तातडीने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई झाली. हे कोकेन तो दिल्लीमध्ये नेणार असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी रुपये इतकी आहे.

५,७९० गोळ्या आढळल्या

२ मे रोजी त्याच्या नावाने एक कुरियर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कुरियरच्या दुकानाबाहेर सापळा रचला. ज्यावेळी सागर आणि त्याचा मित्र राजेश यांनी ते कुरियर घेतले, त्यावेळी अधिकाऱ्यांना त्यांना अडवत त्यांच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये ‘निट्राझेपाम’ नावाच्या ५,७९० गोळ्या आढळल्या.

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिस