Join us

ड्रग्जचा ‘केमिकल लोचा’, तस्करीत कोटींची माया; केमिकल कंपन्यांच्या आडून फोफावतेय जाळे

By मनीषा म्हात्रे | Published: December 15, 2023 5:08 AM

मुंबईसह महाराष्ट्राला पोखरणाऱ्या ड्रग्जविरोधात कारवाईचे सत्र सुरू आहे.

मनीषा म्हात्रे

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राला पोखरणाऱ्या ड्रग्जविरोधात कारवाईचे सत्र सुरू आहे. याच ड्रग्ज तस्करीतून राज्यात महिन्याला हजारो कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. केमिकल कंपन्यांआडून या ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे पसरत असल्याने या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

राज्य पोलिसांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये केलेल्या कारवाईमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली असून पोलिसांनी दोन हजार ४९१ गुन्हे नोंदवत, तीन हजार २७७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर, अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी ९ हजार ५३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे, ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा नाशिकमधील कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर आता राज्यातील बंद पडलेले, भाडेतत्त्वावर दिलेले आणि ड्रग्ज निर्मिती करणारे कारखाने पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांकडून स्थानिक पातळीवर अशा सर्व कारखान्यांची तपासणी होत आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिक, सोलापूरसह विविध भागातील ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त केले आहेत.

आणखी २४ अद्ययावत व्यसनमुक्ती केंद्र

राज्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच सध्या असलेल्या १३० व्यसनमुक्ती केंद्रातून व्यसन मुक्तीचे धडे दिले जात आहेत. येत्या काळात आणखी २४ अद्ययावत व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

 थेट त्या पोलिसांवर  होणार कारवाई 

 अंमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांसह जिल्हा पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत.

  राज्यात सध्या नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्यांवर कारवाई झाल्यामुळे येथील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 त्यांची नियंत्रण कक्षांमध्ये बदली करण्यात आल्याचे राज्य पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितले.

अँटि नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना

राज्यात पोलिस महासंचालक, अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली या अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करणे हा मुख्य उद्देश आहे.