मुंबई : ड्रग्स प्रकरणी विशेष एनडीपीएस न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान व अन्य दोघांची जामिनावर सुटका केली. ड्रग्स बाळगल्याप्रकणी समीर खान याला एनसीबीने १३ जानेवारी रोजी अटक केली. खान यांना ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील तारक सय्यद यांनी दिली.
विशेष एनडीपीएस न्यायालयाने सेलिब्रिटी मॅनेजर राहील फर्निचरवाला आणि अमेरिकेचा नागरिक करण सेजनानी या दोघांचाही ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. याप्रकरणी एनसीबीने जुलैमध्ये आरोपपत्र दाखल केल्यानंतर या समीर खान व अन्य दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. जामिनावर सुटका करण्याची विनंती करताना समीर खान यांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचा हवाला दिला. या अहवलानुसार, एनसीबीने पाठवलेल्या १८ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांत भांग नव्हती. त्यानुसार, आपल्यावर केवळ अल्प प्रमाणात गांजा बाळगल्याचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा एक वर्ष कारावासाची आहे, असे खान यांच्या जामीन अर्जात म्हटले आहे.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त ड्रग्स सेजनानी याच्याकडून जप्त करण्यात आले. त्याचा समीर खान यांच्याबरोबर व्यावसायिक व्यवहार आहे. मात्र, खान यांनी जामीन अर्जात म्हटले आहे की, सेजनानी याने तंबाखूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे आर्थिक मदत मगितल्याचे पुरावे एनसीबीकडे आहेत. ड्रग्ससाठी मदत केल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत.