नशेमुळे चालताही येत नव्हते

By admin | Published: June 10, 2015 02:55 AM2015-06-10T02:55:47+5:302015-06-10T02:55:47+5:30

ईस्टर्न फ्री-वेवरील भीषण अपघातास जबाबदार असलेली जान्हवी गडकर खूपच दारू प्यायलेली होती. एका वरिष्ठ अधिका-याने ‘लोकमत’ला माहिती दिली आहे.

Drugs could not be operated | नशेमुळे चालताही येत नव्हते

नशेमुळे चालताही येत नव्हते

Next

मुंबई : ईस्टर्न फ्री-वेवरील भीषण अपघातास जबाबदार असलेली जान्हवी गडकर खूपच दारू प्यायलेली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला माहिती दिली की, आरोपी महिला (जान्हवी) इतकी नशेत होती, की तिला घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी अन्य वाहनचालकांच्या मदतीने बाहेर काढले, तेव्हा तिला धड चालताही येत नव्हते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अनेक तास तिला कसलीच शुद्ध नव्हती. पार्टी कोणासोबत केली, पार्टीत कोणती दारू प्यायली, हेच काय पण आपल्या गाडीला अपघात झाला आहे, त्यात दोन ठार आणि तिघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत याचीही कल्पना तिला नव्हती.
अपघात झाला तेव्हा आरोपी महिला किती दारू प्यायली होती, हे जाणून घेण्यासाठी तिच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ड्रंकन ड्रायव्हिंगसह निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांन्वये गुन्हा नोंदवून चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला एक दिवस पोलीस कोठडीत धाडले आहे.
चर्चगेट स्थानकाजवळील मरिन प्लाझा हॉटेलमध्ये जान्हवीने आपल्या मित्रांसोबत पार्टी झोडली. घरी परतण्यासाठी तिने फ्री-वेवरून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आॅरेंज गेटजवळ येताच सीएसटीच्या दिशेने उतरणाऱ्या विरुद्ध मार्गिकेवरून तिने कार पुढे दामटवली. सुमारे १० किलोमीटर अंतर तिने त्याच मार्गिकेवरून अत्यंत वेगात कापले. वाशीनाका परिसरात साबूवाला कुटुंबाला घेऊन सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या टॅक्सीला जान्हवीची आॅडी त्याच वेगात धडकली. जान्हवी चेंबूरच्या आरक़े़ स्टुडिओ परिसरातील कृतिका इमारतीत राहते. ती विवाहित असून, वकिली प्रॅक्टिसही करते. शिवाय रिलायन्स कंपनीत ती कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मुलाच्या यशाची पार्टी जिवावर
नळबाजारात साबणाचे व्यापारी असलेल्या सलीम साबूवाला यांचा मुलगा नोमान दहावी पास झाल्यानिमित्त सर्व कुटुंबीय हुसेन सय्यद यांची टॅक्सी करून भिवंडीतील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून साबूवाला कुटुंबीय नळबाजारात फ्री-वेवरून येत होते, तेव्हा हा अपघात झाला.
टॅक्सीचालक हुसेन पूर्वी बीआयटी चाळीत वास्तव्यास होते. मात्र आता ते नागपाड्यात राहतात. अमलीपदार्थ तस्करीच्या आरोपात शिक्षा भोगून आल्यानंतर हुसेन यांनी पुढील आयुष्य टॅक्सी चालवून जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मुले परदेशात असल्याचीही माहिती आरसीएफ पोलिसांना मिळाल्याचे समजते.

दोन गाड्यांचा अपघात होता होता राहिला
फ्री-वेवरून विरुद्ध दिशेने घुसलेल्या जान्हवीच्या आॅडी कारने साबूवाला कुटुंबाच्या टॅक्सीला उडविण्याआधी अन्य दोन कारना उडवले असते. मात्र दोन्ही कार थोडक्यात बचावल्या. ही गाडी विरुद्ध दिशेने चालली आहे, अपघात होऊ शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या कारचालकांनी केला. मात्र ते जान्हवीच्या आॅडीपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.

पोलिसांनी कडक शिक्षा करावी : कायद्याचे ज्ञान असलेल्या या महिलेने दारूच्या नशेत विरुद्ध दिशेने येऊन सलीम साबूवाला यांचे प्राण घेतले. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारे दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
- इम्रान मोदी, साबूवालांचा भाचा

नुरीया हवेलीवाला : अमेरिकेचे नागरिकत्व असलेली ३३वर्षीय भारतीय महिला नुरीया हवेलीवालाने ३० जानेवारी २०१० रोजी दारू पिऊन गाडी चालवत मरिन लाइन्स येथे पाच जणांना उडवले होते. यात चार पोलीस होते, तर एक सर्वसामान्य नागरिक होता.

अभिनेता सलमान खान : अभिनेता सलमान खानने २००२ मध्ये वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत पाच जणांना चिरडले होते. यातील एकाचा बळी गेला. या प्रकरणी सलमानवरही सदोष मनुष्यवधासह दारू पिऊन भरधाव गाडी चालवण्याचा खटला चालवण्यात आला. गेल्याच महिन्यात सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून, सध्या तो जामिनावर आहे.

Web Title: Drugs could not be operated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.