मुंबई/नवी दिल्ली: क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरण उघडकीस आणणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वानखेडे सध्या दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. तिथे ते वरिष्ठांची भेट घेत आहेत. आपल्याला कोणतंही समन्स बजावण्यात आलेलं नाही, असं वानखेडेंनी सांगितलं आहे. मात्र वानखेडे तातडीनं दिल्लीत दाखल झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी काही दिवसांपासून सातत्यानं वानखेडेंवर आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडे वादात सापडले आहेत. याच कारणामुळे वानखेडे यांची बदली मुंबईबाहेर बदली केली जाण्याची शक्यता आहे. याबद्दलचे आदेश दोन दिवसांत निघू शकतात, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.
वानखेडे सध्या दिल्लीत आहेत. ते एनसीबीच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येनं माध्यम प्रतिनिधी उपस्थित असताना वानखेडे मागच्या दारानं कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आली आहे. त्यांची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. खाते अंतर्गत चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याला त्या पदावर राहता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत वानखेडेंना पदावरून दूर करण्यात येईल. याबद्दलचा आदेश पुढील दोन दिवसांत निघेल.
समीर वानखेडेंनी क्रूझ पार्टी उधळून लावत आर्यन खानसह अनेकांना अटक केली. मात्र या प्रकरणात आता त्यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे मुंबई विभागाच्या संचालक पदावरून दूर करतानाच वानखेडेंकडून क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपासदेखील काढून घेतला जाऊ शकतो. याबद्दलचा निर्णय एनसीबीचे प्रमुख घेतील. त्यामुळे वानखेडेंना दुहेरी धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.