लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक पाठोपाठ सोलापुरातील ड्रग्ज फॅक्टरीही उद्ध्वस्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले. या कारवाईत दोघांकडून १६ कोटींचा ८ किलो एमडी साठा जप्त केला आहे. तसेच फॅक्टरीमधून १०० कोटी रुपये किमतीचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधीन मेफेड्रोनच्या (एमडी) कच्चा साठ्यासह फॅक्टरी सील केली आहे. सोलापुरातील दोन सख्ख्या भावांकडून हा ड्रग्ज कारखाना चालविण्यात येत होता.
राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी अशी अटक करण्यात आलेल्या भावांची नावे आहे. दोघेही पूर्वी केमिकल फॅक्टरीमध्ये काम करायचे. यातूनच त्यांनी ड्रग्ज तयार करण्यासंबंधित प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी परिसरातील २१ हजार स्क्वेअर फुटांचा कारखाना भाड्याने घेतला. तेथेच तीन लॅब तयार करत ड्रग्ज बनविण्यास सुरुवात केली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांचा हा कारखाना सुरू होता.
सुरक्षेसाठी त्यांनी दोन सुरक्षा रक्षक नेमले. दोघेच सर्व हाताळत होते. या व्यवहारात दीड महिन्यांपासून त्यांची मुंबईत ये-जा वाढली. दरम्यान गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांना दोघांची टीप लागली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून दोघांना खारमधून अटक केली. त्यांच्याकडून जवळपास १० कोटी ८० हजार किमतीचा ड्रग्ज साठा जप्त केला व या प्रकरणी गुन्हा नोंदवून पथकाने तपास सुरू केला. चौकशीत दोघांच्या फॅक्टरीचे कनेक्शन उघड होताच पथकाने सोलापुरात कारवाई करून तेथील फॅक्टरीतून एकूण ३.००६ किलो तयार मेफेड्रोन व फॅक्टरीमध्ये अंदाजे १०० कोटी रुपये किमतीचा कच्चा साठाही मिळाला. आता दोन्ही आरोपीना १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिकमधून ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त गुन्हे शाखेच्या यापूर्वीच्या कारवाईत नाशिकमधील फॅक्टरी उद्ध्वस्त करत ३०० कोटींचे ड्रग्ज करण्यात आले होते. ममता कुलकर्णी ड्रग्ज प्रकरणही येथलेचगुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलेल्या कारखान्यापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर असलेल्या २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा जोडीदार विकी गोस्वामी आरोपी आहेत. सोलापुरातील एका कारखान्यातून पोलिसांनी २० टन इफेड्रिन जप्त केले होते. याच कारखान्यापासून १०० मीटरच्या अंतरावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरी कारवाई झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.