‘ड्रग्ज फ्री मुंबई’ हेच आपल्या सर्वांचे एकच लक्ष्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:16 AM2023-12-25T06:16:46+5:302023-12-25T06:17:09+5:30
अमली पदार्थ विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष्य आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले.
मुंबई पोलिस आणि खासगी वाहिनी यांच्या वतीने शनिवारी रात्री वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०२३’ या सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. आपल्याला ड्रग्ज विरोधात लढा लढावा लागेल. मुंबई पोलिसांनी हा लढा सुरू केला आहे. तो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्यासाठी सर्वांची मदत, श्रम आवश्यक आहेत.
या कार्यक्रमास मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांसाठी शासन नेहमीच अग्रेसर
पोलिस आमच्यासाठी अहोरात्र काम करतात, त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ती प्रत्येक गोष्ट करण्याकरिता शासन नेहमीच अग्रेसर राहील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुंबई पोलिस आणि त्यांच्या परिवारासाठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत वर्षातून एकदा उमंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करतात, याबद्दल सर्व कलाकारांचे त्यांनी आभार मानले.