मुंबई : हॉलिवूड वेबसीरिजमध्ये अभिनेत्री होण्याचे स्वप्न दाखवत ऑडिशनसाठी शारजामध्ये नेत मुंबईच्या तरुणीला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींनी तिला दिलेल्या टॉफीमध्ये ड्रग्ज मिळाल्याने तेथील पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. अशाच प्रकारे गुन्हे शाखेने अटक केलेल्या दुकलीने तरुणीसह पाच जणांना केक किंवा टॉफीतून ड्रग्ज लपवून त्यांना अडकविल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने राजेश बोभाटे उर्फ रवी आणि अँथनी पॉल या दोघांना अटक करत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. बोरिवली परिसरात तक्रारदार ५६ वर्षीय महिला राहण्यास आहे. त्या रियल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांची २७ वर्षी मुलगी तीन वर्षांपासून अभिनेत्री म्हणून काम करीत आहे. ती हिंदी नाटक, हिंदी चित्रपट व हिंदी वेबसीरिजमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी रवीने मेसेज करून मुलीला हॉलिवूड वेबसीरिजमध्ये संधी मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ग्रँड हयात येथे मुलीसोबत मीटिंगही झाली. त्याने, भारत आणि दुबईत आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहयोग करीत असून तो वेबसीरिज गुंतवणूकदार असल्याचे सांगून मायलेकींना जाळ्यात ओढले. त्याने हॉलिवूड वेबसीरिजसाठी दुबई येथे एक दिवसासाठी ऑडिशनसाठी जाण्यास सांगत असून मुलीला दुबईऐवजी शारजा येथे नेले. तेथे तिला दिलेल्या टॉफीमध्ये ड्रग्ज मिळून आल्याने तेथील पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. अखेर, तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हे शाखेने रवी आणि पॉलला अटक केली आहे. आरोपीने तरुणीच्या सुटकेसाठी जवळपास एक कोटी आठ लाखांची मागणी केली होती. त्यांनी, तरुणीसह पाच जणांचा अशाचप्रकारे विश्वास संपादन करत त्यांना संबंधित नोकरी, क्षेत्र व व्यवसायाचे आमिष दाखवून शारजा येथे जाण्यास भाग पाडले. तेथे कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय न देता त्यांची फसवणूक केली. ते मुंबईत परत येऊ नये, म्हणून त्यांचे परतीचे खोटे व बनावट विमानाचे तिकीट काढून दिले.
असे अडकवायचे... सावजाला बाहेरच्या देशात शारजा येथे जाताना त्यांचा सत्कार म्हणून त्याला टॉफी किंवा केकमधून ड्रग्ज देत होते. पाच जणांपैकी तरुणींसह दोघांना अशाच पद्धतीने शारजा येथे खोट्या गुन्ह्यात अडकविले. बदला घेण्याच्या भावनेतून त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर येत असून याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.