एनसीबीची कारवाई : अंडरवर्ल्डचा अड्डा उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंमलीपदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील एका इमारतीमध्ये छापा टाकून माेठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ, दोन कोटीवर रोकड व रिव्हॉल्व्हर जप्त केले. बुधवारी रात्री व गुरुवारी टाकलेल्या छाप्यात चौघा तस्करांना अटक केली.
परवेझ खान ऊर्फ चिंटू पठाण, झाकीर हुसेन फजल शेख, राहुल कुमार वर्मा व आरिफ भुजवाला अशी त्यांची नावे आहेत. तिघेजण डी गॅंगशी संबंधित असून, जप्त केलेली दोन कोटी १८ लाख २५,६०० रुपये ड्रग्ज तस्करीतून अंडरवर्ल्ड मध्ये पोहोचविले जात होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एनसीबीच्या पथकाने घणसोली येथील प्रोग्रेसिव्ह सिंगेचर कॉम्प्लेक्सच्या बी विंगमधील सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. तेथे कुख्यात तस्कर चिंकू पठाण व झाकीर शेख यांना अटक केली. तेथून २.९ ग्रॅम हेरॉईन,५२.२ ग्रॅम मेफोडेन आणि ९ एमएम ब्लॅक पिस्तूल जप्त केले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने त्याचा साथीदार आणि डीजे म्हणून कार्यरत असलेल्या राहुल कुमार वर्मा याला भिवंडी येथून अटक केली. तो दोघांना ड्रग्जचा पुरवठा करीत होता.
चिकू पठाण व त्याच्या साथीदारांकडून केलेल्या चौकशीनंतर डोंगरातील नूर मंझिल येथील फ्लॅटवर छापा टाकून त्याचा साथीदार आरीफला अटक करण्यात आली. फ्लॅटच्या झडतीमध्ये सहा किलो एक्सेपरेडाइन, ५.६९ एमडी, एक किलो मेथफटाइन, रिव्हॉल्व्हर व रोख दाेन कोटी १८ लाख २५,६०० रुपये सापडले. सर्व जप्त केलेला ऐवज अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही शस्रे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
....................