दाम्पत्य गुंतलेय ड्रग्ज विक्रीत,पत्नीपाठोपाठ पतीलाही बेड्या, लाखो रूपयांचा कफ सिरपचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:16 AM2018-01-14T04:16:35+5:302018-01-14T04:16:41+5:30
ड्रग्ज विक्रीच्या धंद्यात कुर्ल्यातील एक दाम्पत्य रंगल्याचे कुर्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. संतोष हलवाई (४०) आणि आशा हलवाई (३५) असे ड्रग्ज तस्कर दाम्पत्याचे नाव आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री कफ सिरपच्या लाखो रुपयांच्या साठ्यासह आशाला घाटकोपरच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.
मुंबई : ड्रग्ज विक्रीच्या धंद्यात कुर्ल्यातील एक दाम्पत्य रंगल्याचे कुर्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. संतोष हलवाई (४०) आणि आशा हलवाई (३५) असे ड्रग्ज तस्कर दाम्पत्याचे नाव आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री कफ सिरपच्या लाखो रुपयांच्या साठ्यासह आशाला घाटकोपरच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यापाठोपाठ शनिवारी कुर्ला पोलिसांनी तिच्या पतीला १५० कफसिरपच्या बाटल्यांसह अटक केली.
कुर्ला पश्चिमेकडील लक्ष्मीबाईनगर परिसरात हलवाई दाम्पत्य राहते. दोघेही गेल्या तीन ते चार वर्षांपासून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत आहेत. बुधवारी कुर्ला येथील यादव चाळ परिसरात हलवाई ड्रग्जच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती कुर्ला पोलिसांना मिळाली. कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदानंद राणे, पीएसआय सत्यवान पवार, दत्तात्रय करपे, अंमलदार सय्यद, भाबल, गावकर, गालफाडे, गणेश काळे यांनी या ठिकाणी सापळा रचला. हलवाईला बेड्या ठोकल्या. त्याच्या झडतीतून पोलिसांनी १५० कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात त्याला बेड्या ठोकल्या.
थर्टीफर्स्टच्या रात्री आशाला घाटकोपर एएनसीच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ती न्यायालयीन कोठडीत आहे. ती कोठडीत असताना पतीने ड्रग्ज विक्रीस सुरुवात केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रविवारी हलवाईला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महिलेसह दोघांना बेड्या : एएनसीच्या घाटकोपर पथकाने शुक्रवारी कुर्ला पूर्वेकडून ८ लाख किमतीचे २ किलो चरस जप्त केले. या प्रकरणी ५२ वर्षांच्या रेहना इश्फाक शेखला बेड्या ठोकल्या. ती पालघर येथील रहिवासी आहे. तर गुरुवारी रात्री घाटकोपर परिसरात गस्त घालत असताना त्यांनी नालासोपारा येथील कमलेश देवराम मीना (४०) याला अटक केली. त्याच्याकडून ३६० कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. .