* तिघांना अटक
‘एनसीबी’ची छापेमारी सुरूच।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन स्पष्ट झाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) कारवाईची मोहीम वाढली आहे. नवी मुंबईत नेरुळ येथे छापा टाकून कोकेन, एलएसडी व गांजा जप्त केला. एका हौसिंग सोसायटीतील दोन फ्लॅटवर छापे टाकून तिघांना अटक करण्यात आली. सूरज सिंग, अरबाज शेख व विनीत चंदन अशी त्यांची नावे आहेत.
बुधवारी रात्रीपासून गुरुवार दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती.
गेल्या आठवड्यात ‘एनसीबी’ने ड्रग्ज तस्कर चिकू पठाणला घणसोली येथून अटक केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू आहे. दक्षिण मुंबईतील डोंगरी, पुण्यातील खडकवासला, भिवंडी परिसरात छापे टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. गुरुवारी सकाळी ‘एनसीबी’चे एक पथक दोन वाहनांतून नेरुळ येथील सायलेंट व्हॅली हौसिंग सोसायटीमध्ये पोहोचले. ३० नंबरच्या इमारतीमधील दोन फ्लॅटवर छापे टाकले. त्याठिकाणी बेडरूममध्ये लपविण्यात आलेला १० ग्रॅम गांजा, २.३ ग्रॅम एलएसडी, १२१ पेपर ब्लॉट जप्त केले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सूरज सिंगला अटक करून ६ ग्रॅम कोकेन, २१५ एलएसडी ब्लॉट व ४२० ग्रॅम गांजा जप्त केला. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.