मुंबई : औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाच्या रुग्णांसाठी वापरण्यात येणारी ‘ड्रग्ज सेन्सेटिव्हिटी टेस्ट’(डीएसटी) आता मुंबईतील सर्व क्षयरुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग प्रभागाचे उपमहानिर्देशक डॉ. सुनील खापरडे यांनी मुंबईभेटीदरम्यान ही माहिती दिली.मुंबई महापालिकेने सर्व क्षयरुग्णांसाठी डीएसटी उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांची तयारी केली आहे. पण, केंद्रीय क्षयरोग प्रभागाकडून मंजुरी येण्याची वाट पाहात होते. शनिवारी प्रभागाने हिरवा कंदील दिला आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असणे, सायंकाळी ताप येणे ही क्षयरोगाची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे अशा संशयित रुग्णांची क्षयरोगाची तपासणी केली जाते. ही तपासणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना ‘डॉट्स’चे उपचार सुरू करण्यात येतात. पण, या प्रक्रियेत रुग्णाला असलेला क्षयरोग हा औषधांना दाद देणारा क्षयरोग आहे की नाही? याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे रुग्णांना औषधांना दाद न देणारा क्षयरोग असूनही पहिल्या पातळीवरचे उपचार दिले जातात. डॉ. खापरडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘युनिर्व्हसल डीएसटी’मध्ये प्रत्येक संशयित क्षयरोग रुग्णाला औषधाला दाद न देणारा क्षयरोग आहे की नाही, याचे निदान होणार आहे. त्यामुळे या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ रुग्णाला त्या पद्धतीचे उपचार सुरू करण्यात येणार आहेत. पालिका क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, क्षयरोगासाठी रुग्णांना ‘वैयक्तिक उपचारपद्धती’ सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल. डीएसटी सुरू केल्यास प्रत्येक संशयित रुग्णाला असलेला क्षयरोग कोणत्या प्रकारचा आहे, याची तपासणी प्राथमिक पातळीवरच होईल. क्षयरोगासाठी दिल्या जाणाऱ्या १३ औषधांपैकी कोणत्या औषधांना दाद न देणारा क्षयरोग आहे, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)> डीएसटी म्हणजे काय? : ड्रग्ज सेन्सेटिव्हिटी टेस्ट (डीएसटी) या तपासणीआधारे रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधांचा त्याच्यावर परिणाम होतो की नाही, हे तपासले जाते. क्षयरुग्णांना दिल्या जाणाऱ्या १३ औषधांचा परिणाम रुग्णावर कसा होईल, हे पाहिले जाते. मुंबईत ही तपासणी जे.जे. रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात सध्या उपलब्ध आहे. > पहिले पाऊल : पालिका क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, क्षयरोगासाठी रुग्णांना ‘वैयक्तिक उपचारपद्धती’ सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल. डीएसटी सुरू केल्यास प्रत्येक संशयित रुग्णाला असलेला क्षयरोग कोणत्या प्रकारचा आहे, याची तपासणी प्राथमिक पातळीवरच होईल. क्षयरोगासाठी दिल्या जाणाऱ्या १३ औषधांपैकी कोणत्या औषधांना दाद न देणारा क्षयरोग आहे, हे उपचारा दरम्यान स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.
क्षयरुग्णांसाठी ‘ड्रग्ज सेन्सेटिव्हिटी टेस्ट’
By admin | Published: April 25, 2016 3:06 AM