मुंबई – ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. ऐन दिवाळीत मंत्री नवाब मलिकांनीदेवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत फटाक्यांची माळ फोडली आहे. फडणवीसांच्या कृपेनेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरू असल्याचा दावा मलिकांनी केला. ड्रग्स पेडलर यांना संरक्षण देण्याचं काम माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांनी केलं असं म्हणत मलिकांनी बॉम्ब फोडला. याबाबत मलिकांनी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis), देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका आरोपीचा फोटो ट्विट केला होता. आता यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
नवाब मलिकांनी(Nawab Malik) केलेल्या आरोपावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राजकीय विरोधकांना खोट्या आरोपात अडकवणं, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणं हे मागील २ वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा नाही. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. राजकारणात हमाम मे सब नंगे होते है. ज्याचं घर काचेचे असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं फेकू नये. तुमच्या हातात दगड असतील तर आमच्याही हातात दगडं आहेत. आम्ही संयम पाळतो. अजूनही वेळ आहे भाजपानं सुधारावं असं राऊत म्हणाले.
तर नवाब मलिकांच्या जावयावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुलीला आणि कुटुंबीयांना ९ महिने त्रासाला सामोरं जावं लागलं. नवाब मलिकांच्या पाठीशी आम्ही सगळेच आहोत. महाविकास आघाडीच्या नेते, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जातो असं महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं. पवारांवर घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक झाली. देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर द्यायला हवा. राजकारणात ज्यांनी ५० वर्षापेक्षा जास्त काळ काढला. त्यांच्यावर बाहेरून आलेले लोकं आरोप करतात ते महाराष्ट्र सहन करणार नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी मांडावे. तपास यंत्रणांनी चौकशी करावी. ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांनी उत्तरं द्यावीत परंतु महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये असं शिवसेनेला वाटतं असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.