मुंबई विमानतळावर महिलेला अटक; ११ कोटींचे ड्रग्ज पोटात ठेवून केला १४ हजार किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:53 IST2025-03-03T13:21:46+5:302025-03-03T13:53:56+5:30
मुंबई आंततराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेकडून ११ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळावर महिलेला अटक; ११ कोटींचे ड्रग्ज पोटात ठेवून केला १४ हजार किमी प्रवास
Mumbai Airport:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत एका ब्राझिलियन महिलेला अटक केली. या महिलेने कोकेनच्या १०० कॅप्सूल गिळल्या होत्या. या कॅप्सूलमध्ये एकूण १,०९६ ग्रॅम कोकेन होते ज्याची बाजारात किंमत १०.९६ कोटी रुपये आहे.
डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंसला माहिती मिळाली होती की एक ब्राझिलियन महिला भारतात अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी या महिलेला शोधून काढलं आणि तिची तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आलं. महिलेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर थांबवण्यात आले. ती ब्राझीलच्या साओ पाउलो येथून येथून आली होती. महिलेने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत महिलेने भारतात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली.
सीमाशुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतलं. तिच्याकडून पहिल्यांदा झडतीत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र दाट संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ब्राझिलियन महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी महिनेने कोकेनने भरलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. महिलेच्या पोटात तब्बल कोकेनच्या १०० कॅप्सूल होत्या.
महिलेच्या जीवाला धोका असल्याचे पाहून तिला लगेचच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेच्या पोटातून १०० कॅप्सूल काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आल्या. या कॅप्सूलमध्ये १.०९६ किलो कोकेन सापडले. एनडीपीएस कायद्यांतर्गत कोकेन जप्त करण्यात आले आणि त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. दरम्यान ही एक ड्रग्ज तस्करीची अतिशय धोकादायक पद्धत असून यामध्ये कॅप्सूल फुटल्यास एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
दुसरीकडे, गेल्या महिन्यात अशाच प्रकारे एक मोठी कारवाई करण्यात आली होती. एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन वेगवेगळ्या फ्लाइटमधून बँकॉकहून आलेल्या चार भारतीय प्रवाशांकडून सीमाशुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी १३,९२३ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता. या जप्त केलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे १३.९२ कोटी रुपये आहे. एअर इंटेलिजन्स युनिटचे अधिकाऱ्यांना विमानतळावर दोन वेगवेगळ्या फ्लाइटमधून आलेल्या चार प्रवाशांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. अधिकाऱ्यांनी संशयावरून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.